माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या प्रचारावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी कोर्टाने रोहित पवार यांना 13 फेब्रुवारीपर्यंत आपलं मत मांडण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे कोर्टात रोहित पवारांना बाजू मांडावी लागणार आहे. या याचिकेमुळे रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे .
रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी याचिकेत केला आहे.
तसेच सोशल मीडियात राम शिंदेंची बदनामी केली, रोहित पवारांनी निवडणूक खर्चही लपवला, निवडणुकीत बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांचा गैरवापर , असे अनेक आरोप याचिकेत करण्यात आले आहेत.
राम शिंदे यांच्या याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे. रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले होते.