Ahmednagar News : महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची दांडगाई ! महसूल पथकातील कर्मचाऱ्यास बेदम चोपले

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वाळू तस्करी, वाळू वाहतूक, वाळू तस्करांची दहशत या गोष्टी काही नवीन नाहीत. या गोष्टी सर्रास सुरु असल्याच्या घटना समोर आहेत. परंतु महसूलमंत्री अहमदनगर जिल्ह्यातील असताना या कामावर जरब बसेल असे वाटत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्याला वाळू तस्कराने बेदम मारहाण केली आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारात घडली आहे. विशेष म्हणजे माझ्यावर कारवाई केली तर तुम्हाला अॅन्टी करप्शनमध्ये अडकवीन असा दमही या वाळू तस्कराने दिला आहे.

गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. डंपरवरील अनोळखी चालक तसेच मारहाण करणाऱ्या चार वाळू तस्कराविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तलाठी प्रवीण डहाके असे मारहाण झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी : तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरु असल्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी एका पथकाला सोबत घेत देरडे कोऱ्हाळे परिसरात करवाई केली.

या पथकाने पकडलेला वाळू चोरीचा विना नंबरचा डंपर कोपरागमधील तहसील कार्यालयात घेऊन जात असताना जेऊर कुंभारी शिवारात आरोपी राजू शेख व इतर अनोळखी इसम आले.

त्यांनी डंपर थांबवला. आरोपी राजू शेख याने तलाठी प्रवीण डहाके यांना डंपर मधून खाली ओढत मारहाण केली. इतरांनीही तलाठ्यास मोबाईल हिसकावून घेत मारहाण केली. त्यानंतर ढंपर मधील वाळू ओतून देऊन ढंपरसह तेथून पळ काढला.

यानंतर तलाठी यांनी पोलीस ठाण्यात जात आरोपी राजू शेख डंपरवरील अनोळखी चालक आणि इतर तिघे अशा पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यांच्यावर भादंवी कलम 353, 332,379, 143,147149,506 सह पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तत्कालीन तहसीलदार लाच प्रकरणी निलंबित : नुकतेच कोपरगावचे तत्कालीन तहसीलदार यांना वाळूतस्करांकडून पंटरमार्फत लाच स्वीकारत असल्याचे आरोप करत एसीबीने कारवाई केली होती त्यानंतर लगेच त्यांना निलंबितही करण्यात आले होते.

परंतु आता पुन्हा एकदा सध्याचे तहसीलदार संदीप कुमार भोसले कार्यवाही करत असताना असे दहशतीचे प्रकार होऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. या वाळू तस्करांना चाप बसणार का? महसूलमंत्री यावर ठोस कार्यवाही करणार का? असे प्रश्न सध्या नागरिक विचारत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe