ट्रक चालकाकडून कार चालकास मारहाण

संगमनेर : तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर ट्रकचालक विठ्ठलभाई सोमाभाई बावलिया (रा. राजापुरा, ता. चोटीला, जि. सुरेंद्रनगर, रा. गुजरात) याने स्विफ्ट डिझायरचे नुकसान करून तो निघून गेला.

त्याला विलास तुळशीराम काळे (रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर) यांनी चंदनापुरी शिवारात थांबवले. याचा राग येवून ट्रकचालक बावलिया याने काळे यांना चप्पलने मारहाण करून शिविगाळ केली. त्यानंतर त्याच्याकडे तीन फूट लांबीची तलवारही आढळून आली. रविवारी (दि. २४) दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विलास काळे हे आपली स्विफ्ट डिझायर कारमधून (क्र. एमएच १७ एझेड ३५९५) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका येथे रविवारी दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास आले होते.

त्याचवेळी टोलनाक्यावर असलेल्या ट्रकवरील (क्र. जीजे ०३ बी डब्ल्यू ५१५५) चालक बावलिया हा ट्रक मागे घेत असताना ट्रकचा धक्का काळे यांच्या कारला लागून नुकसान झाले. त्यानंतर ट्रकचालक हा भरधाव वेगाने निघून गेला. काळे यांनी ट्रक चालकाचा पाठलाग करत त्याला चंदनापुरी शिवारातील तीन टॉवरजवळ थांबविले असता ट्रक चालकाने काळे यांच्या हातावर चप्पलने मारहाण करून त्यांना शिविगाळ केली.

त्यावर न थांबता ट्रक चालकाने गाडीतील क्लिनर साईडच्या सिटाखालून एक तीन फूट लांबीची तलवार बाहेर काढली व ती घेवून रस्त्यावर फिरत असताना काही लोकांच्या मदतीने काळे यांनी ट्रकचालकास पकडले व घटनेची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment