जामखेड :- तालुक्यातील कोणत्या कार्यकर्त्याची आर्थिक किंमत किती आहे, कोणाला किती पैसे द्यावे लागतात, असे विचारत पैशांच्या जोरावर माणसे खरेदी करण्याची भाषा दोन वर्षांपासून या मतदारसंघात केली जात आहे,
असा आरोप लोकसभा निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यावर केला.
राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांनी शहर व तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेतली.
या वेळी कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी जि. प. सदस्य शहाजी राळेभात, अमजद पठाण, कैलास हजारे, अमित जाधव आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, अनेक संघटनांनी भेटून मला पाठिंबा दिला. काँग्रेस पक्ष तालुक्यात कमकुवत झाला आहे, असे विचारले असता जगताप म्हणाले, ठरावीक जण बाहेर गेले आहेत.
ते जेथे गेले, तेथे स्वत:चा वेगळा पक्ष ठेवतील. आमच्याबाबत दहशतीचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्यांची किती दहशत आहे हे सामान्यांना समजले आहे.