अहमदनगर : कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोल्यात आज मोर्चा काढण्यात आला. या सभेत बोलताना शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांच्यावर हमाला चढवला.
तृप्ती देसाई यांनी हिंमत असेल तर अकोल्यात येऊन दाखवावं, त्यांचं मुंडन करुन परत पाठवू, असा इशारा आष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांना दिला.
“तृप्ती देसाई नगर जिल्ह्यात जेव्हा आल्या तेव्हा इतका मोठा फौजफाटा घेऊन आल्या की त्यांच्या मागे आणि पुढे पोलीस प्रशासन उभं होतं. हे त्यांनी फक्त एक स्मिता आष्टेकरला थांबवण्यासाठी केलं.
आता सांगते दम असेल तर अकोल्यात येऊन दाखवा मुंडन करुन परत पाठवू”, असं स्मिता आष्टेकर म्हणाल्या. स्मिता आष्टेकर यांनी याअगोदरही सोशल मीडियाच्या माध्यमातून तृप्ती देसाई यांच्यावर टीका करत अहमदनगरमध्ये येऊन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं.
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनासाठी अकोल्यात आज मोर्चा काढण्यात आला. महाराजांचं मुळगाव असलेल्या इंदोरीतून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
टाळ आणि मृदुंगच्या गजरात भजन-कीर्तन करत इंदोरीकर महाराजांना समर्थन देण्यात आलं. तृप्ती देसाई यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी इंदोरीतील महिलांनी केली.