अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मामाला रिटायर कर, असे आमचे म्हणणे नाही. पण भविष्यात सत्यजित तुला देखील मतदारसंघ शोधावा लागेल, अशी कोपरखळी मारताना माजी मंत्री राधाकृष्ण विखेंनी पुन्हा एकदा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याच्यावरील आपले राजकीय वैर दाखून दिले.
प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आमदार विखे यांनी आपल्या भाषणात शाब्दिक फटकारे ओढत उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, आमदार रोहित पवार, आमदार आशुतोष काळे, आर. आर. पाटील, युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे आदींची उपस्थिती असलेल्या व्यासपीठावर राजकीय जुगलबंदी रंगली नसती तरच नवल. पण कार्यक्रमाचे अध्यक्ष विखे यांनी नेमकेपणाने संधी साधत कार्यक्रमात आपल्या कोपरखळ्यांनी रंगत आणली.
यावेळी सत्यजित तांबे यांनी गत विधानसभा निवडणुकीवेळी इंदुरीकर यांच्या सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चेवर भाष्य करताना त्याच्या संभाव्य उमेदवारीमुळे आम्ही जरासे धास्तावलो होतो, अशी कबुली दिली. सत्यजित तांबे याच्या या विधानाचा धागा पकडत विखे यांनी वरील विधान केले. विखे म्हणाले, इंदुरीकर महाराजांच्या उमेदवारीची आम्हाला अपेक्षा होती; पण आम्ही आग्रह धरला नव्हता.
सत्यजित आम्ही शक्य असेल तिथेच आग्रह धरतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. भविष्यात राजकारणात त्याचा प्रवेश झालाच, तर तेवढ्याच अधिकाराने याक्षेत्रात काम केल्याशिवाय राहाणार नाहीत, असे सूचक वक्तव्य करीत माजी मंत्री विखे पाटील यांनी पुन्हा इंदुरीकर महाराजांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेला सुरूवात करून दिली.