नवी दिल्ली : भारतात आर्थिक घोटाळा करून परदेशात पळून गेलेल्या एकूण ५१ लोकांनी १७९०० कोटी रुपयांची देशाची फसवणूक केली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) सांगितले आहे की, आजपर्यंत ६६ प्रकरणांमधील ५१ आरोपी फरार असून, त्यांनी अन्य देशांत पलायन केले आहे. ठाकूर यांनी सांगितले की, सीबीआयने दिलेल्या अहवालानुसार, आरोपी व्यक्तींनी १७९४७.११ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
या घटनांमध्ये किती सवलती दिल्या गेल्या वा कर्ज माफ केले गेले होते का, यावर ठाकूर यांनी सांगितले की, ईडी व सीबीआय यांनी या संबंधातील न्यायालयांमध्ये याचिका दाखल केली आहे व अन्य काही कारवाईही जारी आहे. फरार व देशातून पलायन केलेल्या या आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआय काम करीत आहे.
ही कामे विविध टप्प्यांमध्ये असून केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ व सीमा शुल्क विभाग यांनी सहा फरार आर्थिक गुन्हेगांराबाबत अहवाल दिला आहे. ते बेकायदा देशाबाहेर गेलेले आहेत.
सक्त अंमलबजावणी संचलनालयाने फरार आर्थिक गुन्हे अधिनियम २०१८ अंतर्गत सक्षम न्यायालयामध्ये १० व्यक्तींच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत. ८ व्यक्तींसाठी त्यांनी प्रत्यार्पणाकरता केलेल्या अर्जांबाबत इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केलेली आहे, असेही ठाकूर यांनी संसदेत सांगितले