अहमदनगर :- चीनहून परतलेल्या आणखी २३ जणांची सोमवार (१० फेब्रुवारी) ला जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या दक्षतेसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शेनानुसार ही तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, चीनहून गेल्या आठवड्यात देखील २७ जणांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी एक जणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला असून, त्यात त्याला कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारच्या सूचेनुसार तपासणी चीनहून आलेल्या २३ जणांची सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. सर्दी, खोकला याचीही तपासणी करण्यात आली आहे. सकाळ-संध्याकाळ त्यांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.’
चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूमुळे अनेक जणांचे बळी गेले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना खबरदारीचा उपाय म्हणून चीनहून आलेल्यांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यातही चीनमधील वुहान येथून आलेल्यांची प्रामुख्याने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पारनेर तालुक्यातील सुपा येथील एका खासगी कंपनीतील कर्मचारी प्रशिक्षणासाठी चीन येथे गेले होते. ते कर्मचारी १८ जानेवारीदरम्यान भारतात परतले होते.
चीनहून परतलेल्या २७ कर्मचाऱ्यांपैकी २४ जणांना सूचना देऊन सोडून देण्यात आले, तर अन्य चार जणांना सर्दी, खोकला असल्यामुळे त्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या मंगळवारी तपासणी करण्यात आली.
या चार जणांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील पथकाने ही तपासणी केली होती. त्यातील एक जणावर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू होते.
त्याच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला आहे. त्यात त्याला कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चीनहून परतलेल्या आणखी २३ जणांची तपासणी सोमवारी करण्यात आली आहे.