अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सोनई : राज्यात व देशात मुलखा वेगळ्या शनिशिंगणापूर गावाचे नाव खराब होण्यास कारणीभूत असणारे ‘लटकू’ (पूजा साहित्य एजंट) १ जानेवारी २०२० पासून बंद करून विश्वस्त मंडळ शनिभक्तांना नव्या वर्षाची भेट देणार असल्याचा आराखडा तयार होत असून, तसा निर्णय झाल्याची माहिती विश्वस्तांनीच दिली आहे.
या बैठकीला विश्वस्त तसेच खासगी व्यावसायिक उपस्थित होते. परप्रांतीय तरुणांना शिंगणापूर गावातून हद्दपार करण्याचे ठरले असून, नेवासा तालुक्यातील मुलांना व्यावसायिकांनी आपापल्या दुकानात सामावून घेण्याचे ठरविले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून गावात तिनशेहून अधिक तर राहुरी आणि घोडेगाव रस्त्यावर व्यावसायिकांचे दोनशेहून अधिक लटकू वाहनांचा पाठलाग करून व गावात वाहने अडवून शनिभक्तांना महागडे पूजा साहित्य घेण्यास सक्ती करण्याचे प्रकार करीत आहेत.
भाविकांना दमदाटी, शिवीगाळ, फसवणूक व प्रसंगी मारहाण करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. हाच प्रकार देवस्थानचे नाव खराब होण्यास कारणीभूत ठरून अलिकडच्या दोन-तीन वर्षात दर्शनासाठी गर्दी कमी होत असल्याचे बोलले जात आहे.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी आ. शंकरराव गडाख यांच्या सूचनेनुसार विश्वस्त मंडळासह प्रथम शनैश्वर देवस्थान अधिकारी, विविध विभाग अधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांच्या बैठका घेवून सर्व वाहनतळ मालक व व्यावसायिकांची बैठक घेवून भाविकांना समाधानाचं दर्शन मिळण्यासाठी वाईट प्रकार बंद करण्याच्या सूचना केल्या.
१ जानेवारी २०२० पासून लटकूमुक्त गाव करून भक्तांना नव्या वर्षाची भेट दिली जाणार असल्याचे त्यांनी बैठकीत ठणकावून सांगितल्याचे स्थानिकांनी सांगितले. बैठकीतील विषयाची चर्चा काही वेळेतच परिसरात झाल्यानंतर ग्रामस्थ व भाविकांतून या निर्णयाचे स्वागत सुरू झाले आहे.
अनेक व्यावसायिकांच्या धंद्यात ‘लखलाभ’ ठरणारे लटकूंचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यामुळे होणारी व्यावसायिक स्पर्धा बंद होवून नेहमी होणारे वाद होणार नाही.
येथे जास्त प्रमाणात बाहेरगावचेच व्यावसायिक असल्याने त्यांना रोजचा धंदा महत्वाचा आहे. गाव व देवस्थानचे घेणेदेणे नाही, असे ग्रामस्थांत बोलले जात आहे.
प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतील निर्णय नक्कीच गावाच्या हिताचा आहे. आज लटकूबंद निर्णय कडू वाटत असला तरी येथे भाविकांचा ओढा असणेही महत्वाचे आहे. हा निर्णय गावाबरोबरच व्यावसायिक हिताचा आहे, असे सोपानराव बानकर यांनी सांगितले.