रेखा जरे हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा ! बाळ बोठेला मंत्र्याने लपवले?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याला पोलिसांपासून लपवण्यात कोण्या मंत्र्याने ताकद तर लावली नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

रेखा जरे यांच्या मुलानेच ही शंका उपस्थित केल्याने तो आता चर्चेचा विषय झाला आहे.

रेखा जरे यांचा खून कोणत्या कारणाने झाला, हेही अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिस तपासाबाबत संशयाला सुरुवात झाली आहे. यातूनच, याप्रकरणात बाळ बोठे याला लपविण्यासाठी कोणत्या मंत्र्यांनी ताकद लावली आहे का? असा संशय जरे यांच्या मुलाने व्यक्त केला आहे.

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना जरे कुटुंबियांचे वकील सचिन पटेकर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. या निवेदनात म्हटले आहे की, गुन्हा घडल्यापासून बोठे हा चतुर व सूड बुद्धीचा वापर करून पसार झालेला आहे. आतापर्यंत त्याला अटक झालेली नाही.

तसेच त्याचा ठावठिकाणाही पोलिसांना सापडलेला नाही. हे प्रकरण राज्यभरात गाजत असताना त्याला कसला तरी गो-बाय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे जाणवत आहे. बोठे याचा इतिहास पाहिला असता त्याला शासकीय वरदहस्त आहे का?, त्यातून पोलिस यंत्रणेवर दबाव येतोय का?, पोलिस यंत्रणा गोंधळली आहे का?, पोलिसातले काही अधिकारी बोठेला मदत करत आहे का? असे विविध प्रश्न चर्चिले जात आहेत. याचे उत्तर आतापर्यंत मिळू शकलेले नाही.

याचा अर्थ असा की, मास्टरमाईंड असलेल्या बोठेने स्वतःच्याच नियंत्रणात सगळी परिस्थिती ठेवल्याचे दिसते. तसेच गेल्या काही दिवसांपासून नागरिक स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवत आहेत. जे त्याच्या भीतीपोटी समोर येण्यास तयार नव्हते, ते आज धाडस करून समोर येण्यास तयार झाले आहेत.

बोठे याचा मोबाईल तपासामध्ये जप्त करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये असणारे कॉल डिटेल्स मुख्य पुरावा ठरणार आहे. तसेच पोलिसांनी फिर्यादीला संरक्षण दिलेले असले तरी यापुढे जर बोठे सापडला नाही तर, पोलिस संरक्षणात जरे कुटुंबीय किती दिवस भीतीच्या वातावरणात जगणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment