अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- शहरातील उपजिल्हा कारागृहाच्या स्वयंपाक घरातील चाकू हातात घेऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या पावलस कचरू गायकवाड या बंदीने बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केला.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जखमी महिला पोलिस कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यात महिला पोलिस कर्मचारी सुजाता निवृत्ती शेळके-हाडवळे या जखमी झाल्या आहेत. कारागृहातून पळून जाण्याच्या उद्देशाने आरोपीने हा हल्ला केला असल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सुजाता शेळके या कारागृहातील मुख्य प्रवेशद्वारावर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बंदोबस्ताला होत्या.
न्यायाधीन बंदी आरोपी पावलस कचरू गायकवाड याने स्वयंपाक गृहातील चाकू घेऊन, कारागृहातून पळून जाण्याच्या उद्देशाने शेळके यांचे डोक्याचे केस धरून गळ्यावर चाकूने वार केला.
तो वार त्यांच्या डाव्या हातावर झेलल्याने डाव्या हाताला दुखापत केली. कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.