धक्कादायक! पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीतून मोक्कातील आरोपी सोडला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- मोक्का, खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. त्याला पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या गुन्हे शाखेच्या कार्यालयातही आणण्यात आले. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक न करता सोडून दिले.

त्याला ताब्यात घेतल्याचे पिंपरी पोलिसांना साधे कळविण्यातही आले नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीतच थेट मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी सोडून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नगर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण पोलिसांकडे अनिल उर्फ बबन घावटे याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत. या सराईत आरोपीने यापूर्वी पोलिसांवर हल्ला केला होता.

वाळूतस्करीची माहिती पोलिसांना कळविल्याच्या संशयावरुन त्याने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला होता. बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते.

दरम्यानच्या काळात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निगडी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही टोळी सराईत असल्याने घावटे याच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मोक्कातील फरार आरोपी घावटे हा श्रीगोंदा तालुक्यात फिरत असल्याची माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशावरून पथकाने घावटे याला ताब्यात घेतले व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. तेथे कटके यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आले.

त्यानंतर काही बोलणी झाली. त्यानंतर त्याला चक्क सोडून देण्यात आले. यामध्ये खूप मोठी आर्थिक ‘अर्थ’पूर्ण उलाढाल झाल्याचा संशय आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीतून मुखातील आरोपी सोडून देण्याच्या प्रकाराने पोलीस दलाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीतून सोडून दिले जात असतील, तर जिल्ह्यात पोलिसांकडून काय कामाची अपेक्षा करणार? मग गंभीर गुन्ह्यातील आरोपी कसे सापडणार, त्यांना कायद्याचा काय धाक राहणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची काय भूमिका आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सीसीटीव्ही फुटेज ठरणार महत्त्वाचा पुरावा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासल्यास अनिल घावटे याला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्याचे पुरावे मिळतील. हेच पुरावे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या पराक्रमाचा भांडाफोड करतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!