श्रीगोंदे :- दोन लाखांत चांदीची २५ हजार नाणी देण्याचे आमिष दाखवून बेदम मारहाण करत लुटण्याचा प्रकार निमगाव खलू गावच्या शिवारात सोमवारी घडला. तब्बल ३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लुबाडल्याची फिर्याद दिनेश सीताराम भंवर (मंचर, जि. पुणे) यांनी दिली आहे.
मंचरमधील मैत्रीपार्क (मुळेवाडी रोड) येथे राहणाऱ्या भंवर यांना २२ जून रोजी त्यांचा मित्र निकेश कुनकुले (हडपसर) याने आपल्या मावशीजवळ २५ हजार चांदीची नाणी आहेत, असे सांगून त्यातील एक नाणे दाखवले. तुला दोन लाखांत ही नाणी देतो, असे सांगून त्याने मावशीला फोन लावून दिला.
वाळू चाळत असताना ही नाणी सापडली. तुम्ही पैसे घेऊन दौंडला या, तुम्हाला नाणी देते, असे मावशीने सांगितले. भंवर यांनी २ लाख रुपये जमा केल्यावर मित्र निकेशला फोन करून सांगितले. निकेश हा त्याचा एका मित्र घेऊन मंचरला आला.
सोमवारी पहाटे ४ वाजता दिनेश व त्याचा भाऊ निकेशबरोबर झायलो गाडीतून सकाळी सात वाजता दौंडला आले. त्यांनी मावशीला फोन लावला. मावशीने अर्धा तास थांबा असे सांगितले. अर्ध्या तासानंतर मावशीच्या नवऱ्याचा फोन आला.
तुम्ही दौंड-नगर रस्त्याने निमगाव खलु शिवारात खडीक्रशरजवळ पैसे घेऊन या, असे त्यांना सांगण्यात आले. तेथे गेल्यावर चांदीची नाणी द्या, असे सांगितल्यावर आधी पैसे द्या, असे म्हणत उसातून अचानक सहा-सात जण हातात तलवारी, कोयते घेऊन बाहेर आले.
त्यांना पाहून भवर वगळता अन्य तिघे पळून गेले. बेदम मारहाण केल्यानंतर भवरच्या डोक्याला कोयता व तलवार लावून दोन लाख रोख, बावीस हजारांचे घड्याळ, नव्वद हजार अणि पंचवीस हजारांचे मोबाइल असा तीन लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लुबाडण्यात आला. याबाबत श्रीगोंदे पोलिसात सहा-सात जणांच्या विरोधात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.