अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे तालुक्यातील काष्टी येथील भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक असलेल्या सरपंच सुलोचना पोपटराव वाघ यांचे पद जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रद्द केले.
११ ऑक्टोबर २०१७ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. थेट जनतेतून झालेल्या या निवडणुकीत सुलोचना वाघ निवडून आल्या.
निकालानंतर एक वर्षात जात पडताळणी प्रमाणपत्र तहसीलच्या निवडणूक विभागात सादर करणे बंधनकारक असताना, तसेच त्यांना शासनाने मुदत देऊनसुद्धा त्यांनी १० ऑक्टोबर २०१८ पर्यंत प्रमाणपत्र सादर केले नाही.
ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या वेळी वाघ गैरहजर असतात. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा ग्रामपंचायतीच्या कामात वारंवार हस्तक्षेप करत असल्याची तक्रार विक्रम पाचपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सरपंच वाघ व ग्रामसेवकाला पाचारण करून सुनावणी ठेवली. सुनावणीदरम्यान वाघ यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आले.
वर्षभरात जात प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे, यासाठी नाशिक येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालकांकडे अर्जदेखील केला नसल्याचे सुनावणीत सिध्द झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वाघ यांचे सरपंचपद रद्द करत त्यांना अपात्र ठरवले आहे.