श्रीगोंदा :- नगर विधानसभा मतदार संघात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी रुपयांची मदत तातडीने मिळावी व कुकडी च्या पूर्ण हंगामाचे नियोजन करण्यासाठी बैठक बोलून आवर्तन सोडण्यावर निर्णय घेण्यात यावा या दोन मागण्यांसाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात पाचपुते यांनी म्हटले आहे की, ” माझ्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसानभरपाई म्हणून ८ कोटी रुपयांचा पहिला हप्ता तहसील कार्यालयाकडे जमा झाला आहे. ही रक्कम अत्यंत कमी असल्याने उर्वरित २४ कोटी रुपयांची मदत तातडीने मिळावी, यासाठी आपण योग्य ते आदेश निर्गमित करावे.”
तर कुकडी च्या संदर्भात पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “कुकडी प्रकल्प व घोड धरणामध्ये उपलब्ध असणाऱ्या पाण्याचे रब्बी हंगाम, उन्हाळी हंगाम व पिण्याच्या पाण्याचे पुढील नियोजना करिता कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घेण्यात यावी. त्या प्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडण्यासाठी निर्णय व्हावा.”