श्रीरामपूर : कोल्हार-बेलापूर रोडवर उक्कलगाव गळनिंबच्या दरम्यान महिला बचत गटांना कर्ज देणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आले.
शुक्रवारी (दि. ६) डिसेंबर ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकास धोंडीराम कदम (रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) हे फिनकेअर स्मॉल फायनान्स कंपनी राहुरी येथे वसुलीचे काम करतात.
ते वसुली करून बेलापूरमार्गे राहुरीकडे जात असताना दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास उक्कलगाव-गळनिंब शिवारात पाठीमागून दुचाकीवर येणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.
त्यांचे सोबत असणारी बॅग हिसकावून पोबारा केला आहे. त्या बॅगेत ६६ हजार रुपये रोख व एक सॅमसंग कंपनीचा टॅब होता. सायंकाळी उशिरा फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.