…तर अहमदनगर जिल्हापरिषदेत भाजपचा अध्यक्ष होणार !

Ahmednagarlive24
Published:

 अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम होऊ घातला आहे. या रणधुमाळीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उडी घेतली आहे. जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होऊ शकतो.

त्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून, यात अश्­यक्­य काही नाही, असा दावा कर्डिले यांनी केला. काल शुक्रवार रोजी डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी कारखान्याच्या संदर्भात जिल्हा बँकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

पत्रकार परिषदेनंतर राजकीय घडामोडीसंदर्भात देखील किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्डिले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीनुसार वक्तव्य केले.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाची मुदत संपली असून, ग्रामविकास विभागाने पुढील पदाधिकारी निवड प्रक्रिया हाती घेतली आहे.

येत्या २१ तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची नोटीस जारी होत आहे. नोटीस जारी होताच दहा दिवसांनंतर पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल.

स्थानिक स्वराज संस्थेत जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन विविध राजकीय पक्षांकडून यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

मागील आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षाबाबत भूमिका स्पष्ट केली.

नव्याने अस्तित्वात आलेल्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो, असा दावा वळसे यांनी नगर येथील पत्रकार परिषदेत केला.

याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे देखील वळसे यांनी स्पष्ट केले. दरम्यान ना. बाळासाहेब थोरातांनी देखील सूचक वक्तव्य केले. हे सर्व घडत असताना भाजपच्या वतीने जिल्हा परिषद निवडीबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती.

मात्र, काल माजी मंत्री कर्डिले यांनी प्रथमच भाष्य केले. अर्थात पक्षाची प्रबळ दावेदारी कर्डिले करीत असले तरी यामागे विखे- पिता- पुत्रांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने कर्डिले करत असल्याची चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment