अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्यांची मुदत येत्या 20 डिसेंबरला संपणार आहे. त्यानंतर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसतो पण काही तांत्रिक कारणामुळे या पदाधिकार्यांना काळजीवाहू स्वरूपात जिल्हा परिषदेत पुढील पदाधिकारी निवडीपर्यंत काम करावे लागणार आहे.
या विद्यमान काळजीवाहू पदाधिकार्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही . जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाल सप्टेंबर महिन्यांत संपला होता.
मात्र, त्यावेळी विधानसभा निवडीच्या कारणामुळे या पदाधिकार्यांना 120 दिवसांची मुदत वाढ मिळाली. मिळालेली मुदत वाढही 20 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे नूतन पदाधिकर्यांच्या निवडी करण्याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकार्यांना कळवले आहे.
20 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने त्यानंतर प्रचलित पद्धतीने या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान नूतन पदाधिकारी निवडीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद सदस्यांना दि. 21 डिसेंबर रोजी नोटीस पाठवून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या सभेस उपस्थित राहण्याबाबत कळवले जाणार असल्याचे संकेत आहे. नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रमसाठी नोटीस पाठवल्यानंतर किमान 7 ते 10 चा राहणार असून त्यानंतर निवडीसाठी सभा घेण्याची तरतूद कायद्यात आहे.
त्यानुसार ही सभा 31 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.काही कारणास्तव हा कालावधी पुढे ढकलण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे. मात्र, 20 डिसेंबर ते पुढे पदाधिकारी निवड सभा होवून नवीन पदाधिकारी निवडीसाठी आवश्यक असणार्या कालावधीत जिल्हा परिषदेचा पदभार हा काळजीवाहू स्वरूपात जुन्याच पदाधिकार्यांच्या हातहात राहणार आहे.