संगमनेर : घरातील सात ते आठ क्विंटल कापूस विकण्याच्या वादातून मुलाने बापाचा दगडावर डोके आपटून खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री आश्वी येथील गायकवाड वस्ती येथे घडली.
सोन्याबापू किसन वाकचौरे असे मृताचे नाव आहे. सुनेने दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा संतोष वाकचौरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. संतोष वाकचौरे हा रविवारी सायंकाळी दारू पिऊन घरी आला.
फिर्यादी अलका संतोष वाकचौरे, मुलगी गायत्री व सासरे सोन्याबापू जेवण करून झोपण्याच्या बेतात होते. त्याचवेळी संतोषने कापूस विकण्याचा घाट घालत सर्वांनाच शिवीगाळ देण्यास सुरुवात केली.
कापूस जाळून टाकण्याची धमकी देत कुटुंबाला वेठीस धरले. सोन्याबापू यांनी विनवण्या करत कापूस तूच विक व त्याचे पैसेही तूच घे.
मात्र, दारू पिण्याचे सोडून दे, असे म्हणताच याचा राग येऊन संतोषने आपल्या बापाचे डोके जोराने दगडावर आपटले. अलकाने जखमी सासऱ्याला आश्वी पोलिसात नेले. सोमवारी त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. आश्वी पोलिसात संतोषवर गुन्हा दखल करण्यात आला.