कर्जत :- तालुक्यातील एका महिलेस सारी आजाराच्या संशयावरून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. यानंतर मात्र कर्जतमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याची जोरदार अफवा पसरली.
त्यामुळे चुकीची माहिती प्रसारीत केल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी दिली. कर्जत तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.
त्यामुळे तालुक्यातील सर्वांनीच सुस्कारा सोडला असताना काल अचानक कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याची जोरदार अफवा वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली.
याबाबत अनेकांनी पत्रकारांकडे दूरध्वनी करत चौकशी केली तर काहींनी प्रशासनाकडेही चौकशी केली. तालुक्यातील एका महिलेस सारी आजाराचे साम्य असलेली लक्षणे लक्षात आल्यानंतर त्या महिलेस पुढील तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे.
कोणीही घाबरुन जावू नये, या अगोदरही तालुक्यातील तीन संशयित रुग्णांना आपण अशा पद्धतीने पुढील तपासणीसाठी पाठविले होते व त्याचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
या काळात प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असून आपल्याकडे हा आजार आलेला नाही असे म्हणत सोशल डिस्टन्सचे, संचारबंदीचे कोणीही उल्लंघन करू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पुंड यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®