अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी या भागातील आदिवासी समाजामध्ये खून, बलात्कार, जाळपोळ, आत्महत्या असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडत आहेत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी व समाज कल्याण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केली आहे.
रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथील आदिवासी पारधी समाजातील परसराम भालचंद्र काळे (वय २५) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यास गावातील सुभाष मारुती बडे व शिवाजी दिनकर मदगे यांनी शेतात मेंढ्या चारण्याच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. व त्यास आत्महत्येस प्रवृत्त केले. अशी फिर्याद त्याचे मामा विनोद निवृत्ती भोसले यांनी पारनेर पोलीस ठाण्यात सोमवार दि. १२. ऑक्टोबर रोजी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परसराम भालचंद्र काळे हा म्हसेखुर्द ता. पारनेर येथील ग्रामपंचायत हद्दीतील शेतशिवारात मेंढ्या चारायला जात होता. सदर शेतशिवार मेंढ्या चारण्यासाठी त्याने लिलाव पध्दतीने रोख पैसे देऊन घेतले होते. मात्र या ठिकाणी तू मेंढ्या चारू नकोस असा सज्जड दम देऊन, जातीवाचक शिवीगाळ करीत व जिवे मारण्याची धमकी देत सुभाष मारुती बडे व शिवाजी दिनकर मदगे हे त्याला वारंवार त्रास देत होते. रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी नेहमी प्रमाणे परसराम काळे हा आपल्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी त्या शिवारात गेला होता.
त्यावेळी सुभाष बडे व शिवाजी मदगे यांनी त्याच्याशी पुन्हा हुज्जत घातली. तसेच सुभाष बडे याने विनोद भोसले याला फोन केला. व तुझ्या भाच्याला समजावून सांगा नाहीतर आम्ही आमच्या पध्दतीने समजावून सांगू असे सांगितले. त्यावर तुम्ही त्याच्याशी भांडण करू नका, मी त्याला संध्याकाळी समजावून सांगतो, असे विनोद भोसले यांनी सुभाष बडे यांना समजावले. ही घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. त्यानंतर दुपारी ४:३० वाजता देविदास भोसले याला संतोष मदगे यांनी फोन करून सांगितले की,
तुझा भाचा परसराम काळे हा म्हसे खुर्द गावातील शिंदे मळा येथील लिंबाच्या झाडाला लटकलेला असून तो मयत झाल्याचेही सांगितले. त्यानंतर विनोद भोसले व देविदास भोसले हे मोटारसायकल वरून घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांना आपला भाचा परशराम काळे हा लिंबाच्या झाडाला लटकलेला दिसला. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. सदर घटनेबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर सायंकाळी ७ च्या सुमारास पारनेर चे पोलीस पथक घटनास्थळी आले. व त्यांनी परशराम काळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेला.
मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. व दुपारी ३ च्या सुमारास विनोद निवृत्ती भोसले यांनी याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली. विनोद भोसले यांच्या तक्रारीवरून पारनेर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३०६, ३४ व अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मागील महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव फाट्यावर आदिवासी कुटुंबातील ४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पारनेर तालुक्यातील निघोज जवळील पठारवाडी आदिवासी भिल्ल कुटुंबातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
तर सुप्याजवळील वाघूनडें शिवारात आदिवासी महिलेवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातीलच सांगवी दुमाला, तांदळी दुमाला व कर्जत तालुक्यातील अखोनी येथे आदिवासी महिलेवर अत्याचार झाला होता. तर लिंपणगाव येथील आदिवासी कुटुंबाची घरे जाळण्यात आली होती. म्हणजेच गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्ह्यातील आदिवासी समाजावर वारंवार हल्ले होत आहेत. त्यांचे खून होत आहेत, बलात्कार आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत तर अनेकांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे.
त्यामुळे नगर जिल्ह्यातील आदिवासी व भटके विमुक्त समाज असुरक्षित झाला असून जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे असा आरोप ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केला आहे. या सर्व घटनांकडे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक व समाज कल्याण अधिकारी यांनी गांभीर्याने विचार करावा. व अशा घटना जिल्ह्यात वारंवार होणार नाहीत, याबाबत उपयोजना करण्यासाठी तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी अशी मागणीही ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved