अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. कोरोनाला आळा बसावा यासाठी शासनाने गावपातळीवर कोविड सेंटर उभारले आहे. याच्या माध्यमातून रुग्णांची तातडीने तपासणी केली जावी असा उद्देश होतो.
मात्र आता नेवासा तालुक्यातील एक कोविड सेंटर वर कारवाई करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. भेंडा (ता. नेवासा) येथील एका खाजगी हॉस्पिटल मधील कोविड सेंटरकडून रुग्णांच्या नातेवाईकाकडून जास्तीच्या बीलची मागणी केली जात आहे.
या कोविड सेंटरच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी लक्ष्मण भवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भेंडा (ता. नेवासा) येथील एका खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये रेणुकानाथ रामजी भवार (वय 59) यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे
कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी 10 हजार रुपये डिपॉझिट रक्कम भरण्यास सांगितले. तर डिस्चार्ज मिळेपर्यंत एकूण 50 हजार रुपये पर्यंत भरावे लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांनी वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे एकूण 30 हजार 200 रुपये कोविड सेंटर यांच्या अकाउंटवर भरणा केलेला
आहे. सदरील उपचार पूर्णत्वास आल्यामुळे उर्वरित रक्कम 19 हजार 800 रुपये घेऊन पेशंटला डिस्चार्ज करण्याकरिता गेले असता अधिक रकमेची मागणी करण्यात आली. सदरील कोविड सेंटरकडून 1 लाख 21 हजार रुपये भरण्याचे सांगण्यात आले आहे.
ही अतिरिक्त रक्कम कशाकरिता मागत आहात यावर सदरील कोविड सेंटरचे मुख्य डॉक्टरांनी अरेरावीची भाषा वापरुन पैसे पुर्ण भरल्याशिवाय पेशंटला सोडणार नसल्याचे सांगितले. तर येथील कर्मचार्यांनी धक्काबुक्की करुन गेटच्या बाहेर हुसकावले असल्याचे
रुग्णाचा मुलगा लक्ष्मण भवार यांने निवेदनात म्हंटले आहे. जास्तीच्या बीलची मागणी करणार्या संबंधीत डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved