कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आरोग्याची काळजी घ्या – पालकमंत्री

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना आरोग्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणार्‍या आणि स्वताबरोबरच इतरांचे आरोग्याला धोका पोचविणार्‍यावर कडक कार्यवाही करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोरोना हा बरा होणारा आजार आहे, मात्र, त्यासाठी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करुन घ्या, असे आवाहन त्यांनी केले. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असा विश्वास त्यांनी जिल्हावासियांना दिला. दरम्यान, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्याने येथे होणार्‍या इतर आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचार अन्यत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन अहमदनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाटी करावयाच्या विविध उपाययोजनांचा तसेच इतर योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मायकलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. नागरगोजे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषी उपसंचालक विलास नलगे, जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर, अग्रणी बॅंक अधिकारी संदीप वालावलकर, सहायक पुरवठा अधिकारी सुनील सैंदाणे आदींची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सध्या आपल्याकडे कोरोनाचे ७४९ रुग्ण आहेत. त्यापैकी ४९४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. लक्षणे आढळल्यास वेळेत उपचारासाठी दाखल झाल्यास रुग्ण हमखास बरा होऊ शकतो. याशिवाय, मृत्यूही टाळता येऊ शकतात. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. जिल्ह्यात १२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला होता. मे महिन्यानंतर आतापर्यत बाहेरुन येणार्‍या नागरिकांमध्ये आणि त्यांच्या संपर्कात येणारे नागरिक बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वापरताना नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. विनाकारण घराबाहेर पडू नका, अनावश्यक संपर्क टाळा, घरातील वयोवृद्ध आणि लहान मुलांची काळजी घ्या, असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डिस्ट्रीक्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोना वाधित रुग्णांच्या वर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅबमध्ये आता साधारणता दरदिवशी २२५ ते २५० इतक्या चाचण्या केल्या जात आहेत. हे प्रमाण दरदिवशी ३७५ ते ४०० पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय, अॅण्टीजेन कीटच्या माध्यमातून येत्या एक दोन दिवसांत चाचण्यांना सुरुवात होणार आहे. हे कीट जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साधारणता जुलै आणि ऑगस्टअखेरपर्यंत रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील बेड्सची संख्या, ऑक्सीजन सिलींडरची उपलब्धता याचा आढावा घेतला असून पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा कोठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.अतिशय कठीण परिस्थितीत सरकारी डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर पॅरामेडिकल स्टाफ रुग्णांना सेवा देत आहे. काही खासगी डॉक्टर्स स्वताहून पुढे येत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. मात्र, रुग्णवाहिकांवरील चालक कामावर येत नसल्याचे आढळले आहे. अशा संकटाच्या वेळी कामात कुचराई करणार्‍यावर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. काही खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडीकल स्टाफ कामावर येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांनीही अशा अडचणीच्या प्रसंगी जो व्यवसाय त्यांनी निवडला आहे, त्या माध्यमातून कर्तव्य बजावण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

खते व बियाण्यांचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्या

जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीपाच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र सोयाबीन आणि बाजरीच्या बियाणे उगवणीसंदर्भातील तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. संबधित शेतकर्‍यांना बियाणे बदलून द्या तसेच संबंधित कंपनी आणि विक्रेत्यांवर तक्रारी दाखल करा, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यासाठी आता २ हजार ६६० मेट्रीक टन युरिया प्राप्त होणार आहे. त्याचे वितरण व्यवस्थित होईल, हे पाहण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले. त्यासाठी संबंधित दुकांनावर कृषी विभागाचे कर्मचारी नेमा तसेच आवश्यक असेल तेथे पोलिसांची मदत घ्या. कोणत्याही परिस्थितीत खते व बियाणे यांचा काळाबाजार होणार नाही, तसेच लिंकेज होणार नाही, हे पाहा, असे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज देण्याचे बॅंकांना निर्देश

शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी बॅंक आणि सहकार विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. राज्य सरकारपुढे आर्थिक अडचणी असतानाही महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे उपलब्ध करुन दिले. जिल्ह्यासाठी ९४ कोटी रुपये प्राप्त झाले. त

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि केशरी कार्डधारकांना धान्य वाटप

जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच केशरी कार्डधारकांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियतनाप्रमाणे धान्य वाटप करण्यात आले आहे. राज्य शासनाने केशरी कार्डधारकांनाही ऑगस्टपर्यंत सवलतीत अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, शिवभोजन थाळीचा दर पुढील तीन महिन्यांसाठी पाच रुपये ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment