अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात युवकांसह सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत पोलीस टार्गेट पुर्ण करण्यासाठी वाहनधारकांना अडवून पावती फाडत आहे.
अशा वाईट काळात पावती फाडून केली जाणारी आर्थिक दंडात्मक कारवाई त्वरीत थांबविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी केली आहे.
सर्वसामान्यांकडून हा लगान कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करुन या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे.
तर अनेकांना नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. शहरात संध्याकाळी 5 वाजे पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे.
याचा देखील गंभीर परिणाम व्यवसायावर झाला आहे. त्यात दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी रोजगाराची चिंता भेडसावत आहे.
युवकांच्या हातातले कामे गेल्याने युवक लॉकडाऊनच्या तीन महिन्यापासून घरीच बसून होते. युवक वर्ग कामाच्या शोधासाठी बाहेर पडत आहे.
मात्र पोलीस प्रशासन टार्गेट पुर्ण करण्यासाठी पावत्या फाडून नागरिकांकडून दंड वसूल करीत आहे. पैश्याची चणचण असताना पोलीसांकडून होणार्या कारवाईमुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
युवक रोजगारासाठी घरा बाहेर येत आहे. तर शेतकरी वर्ग सकाळी भाजीपाला विक्रीसाठी शहरामध्ये येत असताना त्यांच्याकडून पोलीस पावती फाडत आहे.
ही कारवाई त्वरीत थांबविण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved