जामखेड : सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले आमदार, खासदार नगरसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: राजीनामा दिल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारास विज़यी घोषित करावे तसेच अशा मतदारसंघात सरकारी खर्चातून पुन्हा निवडणूक घेऊ नये, यदा कदाचित पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्यास राज़ीनामा दिलेल्या उमेदवाराकडून पोटनिवडणुकीचा खर्च वसूल केला ज़ावा अशी मागणी महाराष्ट्र धडाका आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. महारुद्र नरहरी नागरगोजे यांनी केली आहे.
याबाबत ॲड. नागरगोज़े यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व जामखेडच्या तहसीलदारांना निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीत विजयी उमेदवार निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षाने काही आमिषे दाखवल्यास पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जातात.
अशा ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा खर्च राज़ीनामा दिलेल्या सदस्याकडून वसूल करावा. तसेच दोन नंबरची मते मिळालेल्या उमेदवाराची त्या रिक्त पदावर निवड करावी.
यापुढे एखाद्या लोकप्रतिनिधीने राज़ीनामा दिल्यास त्या ठिकणी पाच वर्षे पुन्हा निवडणूक घेण्यात येणार नाही, अशी घोषणा राज़्यपाल व निवडणूक आयोगाने येत्या सात दिवसांत करावी अन्यथा मंत्रालयाच्या दारात आमरण उपोषण करू, असा इशारा नागरगोज़े यांनी दिला आहे.