कर्जत : कर्जतच्या जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतीतील उपकारागृहात असलेल्या एका बराकितील सहा आरोपींपैकी खून आणि बलात्कार प्रकारणातील पाच आरोपींनी कारागृहाचे छत उचकटुन पलायन केले.
ही घटना रविवारी सायंकाळी सात ते साडे सातच्या सुमारास घडली. ज्ञानदेव तुकाराम कोल्हे (रा.नान्नज जवळा, ता.जामखेड), अक्षय रामदास राऊत (पारेवाडी, अरणगाव ता.जामखेड), मोहन कुंडलिक (भोरे रा.कवडगाव ता.जामखेड), चंद्रकांत महादेव राऊत (रा.पारेवाडी, अरणगाव, ता.जामखेड), गंगाधर लक्ष्मण जगताप (रा.म्हाळंगी, ता.कर्जत) अशी पळालेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींना पकडण्यासाठी पोलिस विविध पथके रवाना केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.याबाबत सविस्तर असे की, कर्जत जुन्या पोलिस स्टेशनमध्ये चार बराकी असून शेवटच्या बराकीत खून व बलात्काराच्या गुन्ह्यात अटक असलेले सहा आरोपी होते.
त्यातील पाच जणांनी बराकीत असलेले सिलिंग प्रथम तोडले व त्यानंतर छताला असलेली कौले उचकटून, छतावरून मागच्या बाजूला असलेल्या पोलिस वसाहतीसमोर उड्या मारून हे आरोपी पळाले. कर्जत, जामखेड तालुक्यातीलच हे आरोपी आहेत. कर्जत पोलीस स्टेशनच्या चार बराकित २५ ते २८ आरोपी होते.
यातील सर्वात कडेच्या बराकीत हे आरोपी होते. हे आरोपी पळून जाताना त्यांनी उंच असलेल्या भिंतीवरून उड्या मारल्याचे, पाठीमागे राहणाऱ्या पोलिस वसाहतीतील नागरिकांनी पाहिले.