अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नुकतेच महसूल सप्तपदी विजय अभियान सुरू केले होते.
या अभियानाअंतर्गत श्रीगोंदे तालुक्यातील कोरेगाव येथे हिंदू-मुस्लिम स्मशानभूमी मंजूर झाली आहे. हिंदू-मुस्लिम स्मशानभूमी मंजूर कोरेगाव हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.
गावातील हिंदू – मुस्लिम या दोन्ही समाजाला स्मशान भूमी साठी हक्काची जागा मिळाली असल्याच्या मंजुरीचे पत्र नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या हस्ते देण्यात आले.
कोरेगाव येथे हिंदू-मुस्लिम बांधवांना हक्काच्या स्मशानभूमीसाठी अधिकृत जागा मिळण्यासाठी कोरेगावचे सरपंच ज्ञानेश्वर कवडे आणि मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष निसार सय्यद यांनी १२ फेब्रुवारी रोजी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांचेकडे अर्ज केला होता.
कोरेगाव ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तो ठराव श्रीगोंदे तहसीलदारांकडे देण्यात आला होता.तहसीलदार प्रदीपकुमार पवार,कोळगाव चे मंडलाधिकारी डहाले व येथील तलाठी यांनी या ठिकाणी भेट देऊन गावातील स्थानिक ग्रामस्थांसह या ठिकाणची पाहणी केली व तसा पंचनामा तयार करून पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता.
या अहवालावर सर्व विभागांची परवानगी घेऊन कार्यवाही करत महसूल सप्तपदी विजय अभियान अंतर्गत कोरेगाव या ठिकाणी हिंदू मुस्लिम समाजासाठी अधिकृत स्मशानभूमी मंजूर झाल्याचा आदेश काढला. जिल्ह्यातील पहिली हिंदू-मुस्लिम स्मशानभूमी मंजूर झालेले कोरेगाव हे पहिले गाव ठरले आहे.
याकामी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांचे सहकार्य लाभले असल्याचे सरपंच कवडे व सय्यद यांनी सांगितले. महसूल सप्तपदी विजय अभियान अंतर्गत जिल्ह्यात सर्वप्रथम कोरेगाव मध्ये झालेल्या या निर्णयामुळे हिंदू व मुस्लिम बांधवांना हक्काच्या स्मशानभूमीसाठी अधिकृत जागा मिळाली आहे.
या महत्वपूर्ण निर्णायक निर्णायाचे स्वागत आहे. या निर्णयाने कोरेगावात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले आहे, अशी प्रतिक्रिया मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष निसार सय्यद यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम