सरकार बदल्‍यांसाठी ‘मंत्रालय’ सुरु करते, पण भाविकांसाठी मंदिर बंद ठेवते !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  कोणत्‍याही संवेदना नसलेल्‍या महाविकास आघाडी सरकारने आध्‍यात्मिक क्षेत्रालाही वेठीस धरले आहे. सरकार बदल्‍यांसाठी ‘मंत्रालय’ सुरु करते, पण भाविकांसाठी मंदिर बंद ठेवते. मॉलमध्‍ये झालेली गर्दी सरकारला चालते, मंदिर सुरु करतानाच भाविकांच्‍या गर्दीची भिती का दाखविली जाते?

असा सवाल करत भाविकांच्‍या ‘श्रध्‍देचा सन्‍मान’ आणि व्‍यवसायीकांच्‍या ‘भावना’ लक्षात घेवून तातडीने मंदिर आणि प्रार्थनास्‍थळे सुरु करा अन्‍यथा पुढील आंदोलन टाळ, मृदुंगासह वर्षा बंगल्‍या समोर आम्‍हाला करावे लागेल असा इशारा माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला.

शिर्डीतील श्री.साईबाबा मंदिरासह राज्‍यातील सर्व मंदिरं आणि प्रार्थनास्‍थळ सरकारने सुरु करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने ‘दार उघड उध्‍दवा दार उघड’ आंदोलन केले. नगरपंचायत कार्यालयापासुन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली नगरसेवक, ग्रामस्‍थ आणि वारक-यांनी टाळ, मृदुंगांचा गजर करत श्री.साईबाबा मंदिराच्‍या प्रवेशव्‍दारा समोर आंदोजन केले.

महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात घोषणा देण्‍यात आल्‍या. साईनामाचा गजर करुन या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्‍यात आले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, उपनगराध्‍यक्ष मंगेश त्रिभूवन, भाजयुमोचे प्रदेश उपाध्‍यक्ष सचिन तांबे,

भाजपाच्‍या ओबीसी आघाडीचे उपाध्‍यक्ष प्रकाश चित्‍ते, शिवाजी गोंदकर, कैलासबापू कोते, शिवाजी गोंदकर, सुजीत गोंदकर, नितीन कोते, ज्ञानेश्‍वर गोंदकर, प्रतापराव जगताप आदिंसह पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. आपल्‍या भाषणात आ.विखे पाटील म्‍हणाले की, मंदिर उघडावीत या मागणीसाठी रस्‍त्‍यावर येवून आंदोलन करावे लागते हे दुर्दैव आहे.

सत्‍तेवर बसलेल्‍या बही-या, मुक्‍या, आंधळ्या महाविकास आघाडी सरकारला कोणत्‍याही संवेदना नाहीत. पाच महिन्‍यांपासुन मंदिरे, प्रार्थनास्‍थळे बंद आहेत. या तिर्थक्षेत्राच्‍या ठिकाणचे अर्थकारण थांबले आहे, व्‍यवसायीक अडचणीत सापडले आहेत. त्‍यांना दिलासा देण्‍यासाठी मंदिरं सुरु करण्‍याची आज खरी गरज आहे. पण सरकार ‘मदिरालय’ सुरु करते पण मंदिर बंद ठेवते.

सरकार कोणताही निर्णय डोके ठिकाणावर ठेवून घेत नाही अशी टिका करुन, बदल्‍यांसाठी मंत्रालय उघडणा-या सरकारला भाविकांसाठी मंदिर उघडावीशी वाटली नाहीत. सरकार मॉल सुरु करण्‍यासाठी परवानगी देताना गर्दीचा विचार करत नाही, मग मंदिर सुरु करतानाच सरकारला भाविकांच्‍या गर्दीची भिती का वाटते? असा सवाल उपि‍स्‍थत करुन आ.विखे पाटील यांनी सांगितले की,

आषाडी वारीला संत तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्‍वरांच्‍या पादुका हेलीकॉप्‍टरने नेण्‍याचा वल्‍गना आघाडी सरकारने केल्‍या होत्‍या. प्रत्‍येक्षात मात्र एस.टी ने पादुका पाठवून महाविकास आघाडी सरकारने वारकरी सांप्रदायाचा अपमान केला आहे. जनतेच्‍या कोणत्‍याही भावनांची कदर नाही. कोरोना संकटात जनतेने सर्व नियम, कायदे पाळले.

आता अजुन कीती दिवस कायद्याचा धाक दाखवून जनतेला आणि भाविकांना वेठीस धरणार असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केला. राज्‍यातील सर्व मंदिरांकडे ऑनलाईन मंदिरांची सुविधा आहे. मंदिरांचे विश्‍वस्‍त भाविकांच्‍या आरोग्‍य सुरक्षेचे नियोजन करु शकतात. तिर्थक्षेत्रांच्‍या ठिकाणी असलेल्‍या व्‍यवसायीकांचे प्रश्‍न गंभिर झाले आहेत.

त्‍यांना दिलासा देण्‍यासाठी सरकारने तातडीने निर्णय करावा अन्‍यथा यापेक्षाही तिव्र आंदोलन आम्‍हाला करावे लागेल असा इशारा आ.विखे पाटील यांनी दिला. खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, लाखो भाविकांच्‍या भावनेचा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. राज्‍यातील आघाडी सरकारकडे मागुन काही मिळत नाही, आता परमेश्‍वराकडे तरी आम्‍हाला काही मागु द्या असा टोला लगावून आम्‍हाला परमेश्‍वराकडे प्रार्थना करण्‍याचा संधी द्या.

आज मंदिर आणि परिसराभोवती गावांचे असलेले जनजिवन ठप्‍प झाले आहे. या गावांमधील अर्थकारण थांबले आहे. अशा सर्व परिस्थितीत निर्णय करण्‍याची गरज आहे. परंतू सरकारला याचे गांभिर्य नाही. वेळीच निर्णय न घेतल्‍यास आम्‍हाला न्‍यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा खा.डॉ.विखे पाटील यांनी दिला. ग्रामस्‍थ, भाविक आणि वारक-यांच्‍या मागण्‍यांचे निवेदन आ.विखे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिले.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved