अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक भागात झालेल्या शेती पिकांसह इतर नुकसानीची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना जास्तीची मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन मंत्री थोरात यांनी या वेळी दिले.
तालुक्यातील आंबीखालसा, तांगडी, पाणसवाडी आदिंसह पठार भागातील अनेक गावांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केली.
अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, प्रियंका गडगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपसरपंच सुरेश कान्होरे, गोकुळ कहाणे, बाळासाहेब ढोले, सुरेश गाडेकर, अॅड. सुहास आहेर, सुहास वाळुंज आदींसह महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री थोरात म्हणाले, राज्यात कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचे संकट आले. सरकार व प्रशासनाने वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र चांगली आपत्कालिन व्यवस्था उभी केली होती.
कोकण किनार पट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. त्याच बरोबर संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उभ्या पिकांसह इतर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या घास वादळाने हिरावून घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे व इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews