अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत असलेल्या भागवत मळा येथील राधू भागवत या शेतकऱ्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी अचानक गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परंतु, शेतातील पिके जगविण्यासाठी भागवत यांच्यावर लगेच बोअरवेल घेण्याची वेळ आली आहे. खंदरमाळ शिवारातील भागवत मळा व परिसरातील आठ ते दहा दिवसांपूर्वी अचानक सात ते आठ शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कशामुळे हे पाणी गेले. ते मात्र शेतकऱ्यांना समजू शकले नाही. आधीच महिनाभर झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. असे असतानाही सर्वसामान्य शेतकरी पुन्हा उभा राहिला आहे.
भागवत यांच्या शेताच्या कडेला जवळपास पन्नास फूट खोल विहीर असल्याने त्या विहिरीलाही भरपूर पाणी होते. त्यामुळे त्यांनी आपल्या शेतात विविध पिके घेतली आहे. परंतु, भूगर्भातील हालचालींमुळे विहिरींचे पाणी अचानक गेले.
विहिरीला आतून तडेही गेले आहेत. शेतातील पिके कशी जगवायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. भागवत यांनी लगेच शेतातील पिके जगविण्यासाठी बोअरवेल घेतला आहे आणि त्याला पाणीही लागले आहे.