अबब !… एकाही परप्रांतीय मजुराचा प्रवास खर्च केंद्राने उचललेला नाही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातून आपापल्या राज्यांमध्ये परतलेल्या मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा एकही दमडीचा खर्च केंद्र सरकारने उचललेला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च केल्याचे माहिती देशाला दिली. देशवासियांना चुकीची माहिती देणाऱ्या सीतारामन या खोटारड्या असल्याचे, अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

किरण काळे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली. तेव्हा ही धक्कादायक माहिती उघड झाल्याचे काळे यांनी म्हटले आहे. संघटनेच्या माध्यमातून माहिती घेतली असता, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील हीच स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत काळे यांनी प्रशासनाचा हवाला देत म्हटले आहे की, नगर जिल्ह्यांमधून आजपर्यंत नऊ रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. यातील काही गाड्या शिर्डी येथून तर काही नगर रेल्वे स्टेशन वरून सोडण्यात आल्या. यातील एक गाडी ही मध्य प्रदेशला रवाना झाली. त्या गाडीतील सुमारे बाराशे मजुरांचा खर्च हा मध्य प्रदेश सरकारने केला. उर्वरित आठ गाड्या उत्तर प्रदेशसाठी रवाना झाल्या.

या आठ गाड्यांपैकी सात गाड्यांचा खर्च हा स्वतः मजूर, त्यांचे कंत्राटदार यांनी केला. *या मजुरांना रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने खर्च करून मदत करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथून विशेष बसेसच्या माध्यमातून मजुरांना रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना फूड पॅकेट्स उपलब्ध करून दिले. तसेच जिल्ह्याच्या विविध भागातील मजुरांना रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत केली.

राज्यात मजुरांना मदत करण्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेतला आहे. परवा दिवशी सुटलेल्या रेल्वेचा खर्च राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सीएम केअर फंडामधून केला आहे, यासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला निधी उपलब्ध करून दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला मजुरांच्या तिकिटाची रक्कम अदा केली आहे.

येथून पुढच्या काळात नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या मजुरांचा प्रवास खर्च सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या वतीने जाणार आहेत. मजुरांना जाण्यासाठी सर्वतोपरी मदत आमचे काँग्रेस कार्यकर्ते करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार देशवासीयांची दिशाभूल करत आहे. अर्थमंत्री सीतारमण या आजवरच्या सर्वात खोटारड्या अर्थमंत्री आहेत. आम्ही त्यांचा अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करत असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment