श्रीगोंदे – सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ महिन्यांवर येऊन ठेपली असताना कारखाना प्रशासनाने एका वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देऊन ज्या सभासदांचे शेअर्स अपूर्ण आहेत, त्यांनी डिसेंबरअखेर पूर्ण करावेत, अन्यथा मतदानास वंचित राहावे लागेल असा फतवा काढल्याने सभासदांमध्ये नाराजी पसरली आहे.
नागवडे कारखान्याची उभारणी सुमारे ४५ वर्षांपूर्वी झाली, त्यावेळी सभासदत्व शुल्क ३ हजार रुपये होते. त्यानंतर ते ५ हजार रुपये करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी शेअरची रक्कम १० हजार करण्यात आली. श्रीगोंदे आणि शिरूर तालुक्यातील कारखान्याचे सुमारे २२ हजार ७३१ महिला व पुरुष सभासद असून यापैकी काही शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून रकमेची पूर्तता करण्यात आली.

तथापि, साडेसात ते आठ हजार सभासदांचे शेअर्स अपूर्ण आहेत. सभासदांना ५ ते ७ हजार रुपये भरून शेअर्स पूर्ण करावे लागणार आहेत. त्यामुळे कारखान्याला सुमारे ४ कोटी रुपये मिळणार आहेत.