जामखेड :- महिलांचे केस असलेल्या सहा लाख ३० हजार किमतीच्या पाच पिशव्यांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सहाव्या आरोपीने आणखी दोन साथीदारांची नावे उघड केली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने या आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता आठ झाली आहे. ३१ जुलै २०१९ रोजी सचिन तायप्पा वाघमोडे (आरोळेवस्ती, वैदूवाडी, जामखेड) यांच्या घरासमोरील पडवीत ठेवलेल्या महिलांच्या केसांच्या पाच पिशव्या (वजन १५० किलो, किंमत ६ लाख ३० हजार रुपये) चोरीस गेल्या.
याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांवर चोरीचा गुन्हा दाखल केला. राम महादेव राठोड, बाळू यादव लोखंडे, विशाल बाळू लोखंडे, सागर बाळू लोखंडे, प्रकाश ऊर्फ पारस छगन काळे (सर्व राहणार झोपडपट्टी) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
सहावा आरोपी विकास मिलिंद घायतडक मात्र फरार झाला होता. विकास घायतडक याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने ताया बाबूराव चव्हाण व मारूती बाबूराव चव्हाण अशा दोन आरोपींची नावे सांगितली. या आरोपींना पोलिसांनी सोमवारी सकाळी राहत्या घरी अटक केली.