क्लासिक व्हील्सच्या कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड

Published on -

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  एमआयडीसी मधील क्लासिक व्हील्स कंपनीतील जुन्या कामगारांना डावलून टाळेबंदीचे कारण पुढे करीत कंत्राटी पध्दतीने नवीन कामगारांची भरती केली जात असल्याने अनेक युवा कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.

पुर्वीच्या कामगारांना प्राधान्य देऊन कंपनीत कामाला घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.यामध्ये कामगार वर्ग सहभागी होणार असल्याची माहिती उपचिटणीस नंदू गंगावणे यांनी दिली.

एमआयडीसी मधील क्लासिक व्हील कंपनीत बहुतांश कामगार हे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पाच महिन्यांपासून देशात टाळेबंदी सुरू होती. पण आता टाळेबंदीला बर्‍याच प्रमाणात सूट मिळाली आहे. सदर कंपनीचे काम पुर्ववत सुरु झाले आहे.

परंतु 10 ते 20 वर्षापासून काम करत असलेल्या कामगारांना डावलून नवीन कामगार कंत्राटदारा मार्फत भरती करून उत्पादन सुरु आहे. अनेक वर्षापासून कंपनीच्या सेवेत असलेल्या कामगारांना टाळेबंदी काळातील वेतनही देण्यात आलेले नाही. परिस्थितीची जाणीव ठेऊन कामगारांना या वेतनाची मागणी देखील केली नाही.

तरीसुद्धा व्यवस्थापनाने जुन्या कामगारांना कामावर न घेतल्याने त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. कंपनीच्या अशा चुकीच्या धोरणामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कामगारांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आंदोलनात दररोज चार कामगार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत साखळी पध्दतीने उपोषण करणार आहे. सदरील कामगारांना पुन्हा सेवेत रुजू करुन न घेतल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ.मनोज चव्हाण, कार्याध्यक्ष संतोष धुरी, सरचिटणीस गजानन राणे, चिटणीस सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे नंदू गंगावणे यांनी म्हंटले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe