अहमदनगर :- वेळोवेळी वादात सापडलेली नगर अर्बन बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बँकेच्या शेवगाव येथील शाखेत सुमारे सात लाख रुपयांचे बनावट सोने तारण म्हणून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तारण ठेवलेल्या सोन्याची लिलाव प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार समोर आला. याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक एस. सी. मिश्रा यांनी दिली. दरम्यान, तारण सोन्याची लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली असून उर्वरित सोन्याची तपासणी करण्यात येणार आहे.
नगर अर्बन बँकेने सुमारे पाच कोटी रुपये किमतीच्या थकीत सोने तारण कर्ज खात्याची लिलाव प्रक्रिया बुधवारी दुपारी राबवली. लिलावात ३५० सोने तारण पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या.
त्यापैकी तब्बल ३३४ पिशव्या शेवगाव शाखेतील होत्या. या शाखेतील सोने तारणाची लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा पिशव्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर तीन पिशव्यांमध्ये बनावट सोने असल्याचे आढळून आले.
बँक कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती प्रशासक मिश्रा यांना दिली. त्यांनी तातडीने लिलाव प्रक्रिया थांबवली. शेवगाव शाखेतील तीन पिशव्यांमध्ये सुमारे सात लाख रुपयांचे बोगस सोने आढळून आले असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वीच श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी शाखेत बनावट सोने कर्जप्रकरण समोर आले होते. आता शेवगाव शाखेत हा प्रकार उघड झाल्याने बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे.