Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट अहमदनगर शहर मतदारसंघ

Ahmednagarlive24
Published:

युतीत बेकी, राष्ट्रवादीत दुही

अहमदनगर  विधानसभा मतदारसंघात साठच्या दशकानंतर तीन दशकं कोणतीही व्यक्ती दुस-यांदा आमदार होत नव्हती; परंतु शिवसेनेच्या अनिल राठोड यांनी ही परंपरा मोडीत काढली.

अहमदनगरची सामाजिक रचना, धार्मिक विभागणी लक्षात घेऊन बहुसंख्याकांच्या मनात अल्पसंख्याकांविषयी सातत्यानं दुहीची बीजं पेरून त्यावर आपली मतांची पोळी भाजून घेण्यात राठोड सातत्यानं यशस्वी होत गेले. त्याला कारण ही अन्य नेत्यांची कायमच एका ठरावीक समाजाची हुजरेगिरी हे होतं. गेल्या वेळच्या निवडणुकीत हे चित्र बदललं.

देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी राठोड यांचा पराभव केला. युतीच्या 1995 ते 1999 च्या काळाचा अपवाद वगळता नगर शहरानं 1985 नंतर सातत्यानं विरोधी पक्षाचा आमदार निवडून दिला आहे.

गेल्या वेळच्या निवडणुकीत चाैरंगी लढत झाली होती. त्याचा फायदा जगताप यांना मिळाला. नगर शहराची निवडणूक दहशतमुक्ती आणि अल्पसंख्याकांची भीती या दोनच मुद्यांवर कायम लढली गेली. विकासाचे प्रश्न फारसे चर्चिले गेले नाहीत. नगर हे अजूनही एका मोठ्या खेड्यासारखं राहिलं. इथल्या गुंडगिरीमुळं उद्योजकांनी पाठ फिरवली.

विकासाच्या मुद्द्यांकडं लोकांचं लक्ष जाऊ नये, याची पुरेपूर काळजी नेत्यांनी घेतली. विकासाच्या मुद्यावर लोक बोलतात; परंतु कधीच रस्त्यावर येत नाहीत. नगरकरांच्या या सोशिकतेचा फायदा सर्वंच राजकीय नेत्यांनी घेतला. आपण भलं आणि आपलं घर भलं या पलीकडं नगरकर पाहायला तयार नाहीत. शहराविषयीचा आपलेपणाचा लवलेशही नगरकरांमध्ये नव्हता. आता आय लव्ह नगर या मोहिमेमुळं तो थोडा आला असेल, इतकंच.

विकासाच्या मुद्यावरून परस्परांवर चिखलफेक करणा-या नेत्यांच्या हे ही लक्षात येत नाही, की अहमदनगरमधील बहुतांश सत्तास्थानं आलटून पालटून त्यांच्याच ताब्यात आहेत. कुणी विधानसभेवर तर कुणी विधान परिषदेवर आमदार आहेत. जनता ही नेत्यांची चिखलफेक निमूटपणे पाहते. 

गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानं शिवसेनेला मोठा फटका बसला. शिवसेना आणि भाजप दोघांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि युतीच्या मतांचं विभाजन झाले. याचा फायदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिलेल्या संग्राम जगताप यांना झाला.

दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज केली आणि युतीच्या मतांची बेरीज केली, तरी सात हजारांचा फरक होता. गेल्या पाच वर्षांत संग्राम यांनी विधानसभेत किती कामं केलं आणि शहराचे किती प्रश्न मार्गी लावले, हा संशोधनाचा विषय असला, तरी त्यांनी रस्त्यावरचा आमदार ही प्रतिमा कायम ठेवली.

सामान्यांत उठबस असलेला, कायम वेगवेगळे प्रयोग करणारा तरुण ही त्यांची प्रतिमा घडत गेली. शहरातलं त्यांचं संघटन चांगलं राहिलं. महानगरपालिकेची सत्ता मिळविता आली नाही; परंतु भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात त्यांना यश आलं. शिवसेनेखालोखाल महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनंच जागा मिळवल्या.

असं असलं, तरी लोकसभेच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर संग्राम यांचं तळ्यात मळ्यात चालू होतं. शिवसेना-भाजपची युती झाली नसती, तर कदाचित ते भाजपचे उमेदवार असते. शिवसेनेत जाण्याच्या बातम्यांत मात्र फारसं तथ्य नव्हतं. त्याअगोदर केडगाव इथं गेल्या दीड वर्षांपूर्वी शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या.

त्यात जगताप यांचं नाव गोवलं गेलं. त्यांच्याविरोधात कोणताही आरोप पोलिसांना सिद्ध करता आलं नाही.  जामीन न घेता संग्राम यांनी तुरुंगात राहणं पसंत केलं. संग्राम स्वतः गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसले, तरी त्यांच्याभोवतीच्या अनेकांच्या बाबतीत तसं म्हणता  येत नाही. तीच गोष्ट पूर्वी राठोड यांच्याबाबतीतही खरीच होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली आहे. किरण काळे यांच्यावर तर अनेकदा शारीरिक हल्ले झाले. त्यांनी आता राष्ट्रवदी सोडून वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आहे. अर्थात ते मासबेस नेते नाहीत. वंचित आघाडीची ताकदही फारशी नाही.

माजी महापाैर अभिषेक कळमकर यांचा पर्याय राष्ट्रवादी पुढं  आणीत होती; परंतु जगताप पक्षातच राहिल्यानं तो पर्याय मागं पडला असला, तरी शरद पवार यांच्या भाषणानंतर जगताप-कळमकर गटात झालेली हाणामारी पक्षात आलबेल नाही, हे दाखविणारी होती. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकदिलानं वागली. त्याचं कारण सुजय विखे यांची उमेदवारी होती.

त्यानंतर आता माजी खासदार दिलीप गांधी यांच्या गटानं आपली नखं बाहेर काढली आहेत. राठोड आणि गांधी यांच्यात विस्तव जात नाही. महापालिकेची निवडणूक त्यामुळंच युती न होता झाली. राठोड यांची उमेदवारी बदलली, तरच काम करू, अशी भूमिका गांधी यांनी घेतली होती. शिवसेनेनं राठोड यांची उमेदवारी कायम ठेवली.

मतदारसंघ बदलण्याच्या गांधी यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यामुळं गांधी गट खरंच राठोड याचं काम करणार का हा खरा प्रश्न आहे. भाजपतील अभय आगरकर गट मात्र राठोड यांचं काम करील. माजी महापाैर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढले होते. ते गांधी गटाचे होते. शिवसेनेच्या आंदोलनामुळं त्यांना पक्षातून काढावं लागलं.

महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढून बाजी मारली. आता ते बसपचे उमेदवार आहेत. त्यांना गांधी गट मदत करणार, की राठोड यांना यावर निकालाची गणित अवलंबून आहेत.

महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात जगताप यांची मोलाची मदत झाल्यानं राठोड यांना धडा शिकवण्यासाठी जगताप यांना पडद्याआडून मदत गांधी करणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. अर्थात गांधी गटाची ताकद मर्यादित आहे; परंतु चुरशीची लढत झाली, तर तीही निर्णायक ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment