अहमदनगर: नगर जिल्ह्यातील सम्राट ‘बारा-शून्य’ करू असा नारा देत होते. त्यांना गर्व झाला होता. साधन संपत्ती त्यांच्या हाती होती, पण त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार दिलीप वळसे यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना नाव न घेता लगावला.
नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, किरण लहामटे, आशुतोष काळे,
नीलेश लंके, प्राजक्त तनपुरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, युवा जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड, निर्मला मालपाणी, श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा अदिक, शहराध्यक्ष माणिक विधाते आदी उपस्थित होते.
वळसे म्हणाले, राज्यात विरोधी पक्षनेता राहणार नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तथापि, शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत विजयश्री खेचून आणली. जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. सत्तेसाठी महाविकास आघाडी तयार झाली. विरोधात बसणारे सत्तारूढ झाले.
शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत. तरुणांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सत्ता सोडताना अडीच लाख कोटींचे कर्ज होते. पाच वर्षांत राज्यावर ७ लाख पन्नास हजार कोटींचे कर्ज झाले आहे. दरवर्षी ३८ ते ४० हजार कोटींचे व्याज भरावे लागते अशा स्थितीत जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत.
आमदारांनी आपल्या मतदारसंघाबरोबरच राज्याचाही विचार केला पाहिजे. विधानसभेत उपस्थित राहून अभ्यास केला पाहिजे, असे वळसे यांनी सांगितले.