पाथर्डी :- तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये लॉकडाऊन असतांना देखील ‘शासनाचा आदेश धुडकावत अज्ञात दहा ते बारा जणांनी मंदिरामधे एकत्र येवून आरती केली.त्यावरून कलम १८८,२६९ नुसार पाथर्डी पोलिस स्टेशनला पोलिस कर्मचारी ईश्वर बेरड यांनी फिर्याद दिली आहे.
तर यात्रेनिमित साधत भैरवनाथ मंदिराजवळ कुस्त्या लावून जमावबंदी आदेश धुडकावल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ सुखदेव श्यामराव गीते यांनी केली आहे. त्यामुळे लोहसर गावात नेमकं चाललयं काय अशीच चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

लोहसर येथे काळभैरवनाथ यात्रोत्सवाच्यानिमित्त सरपंच व काही पदाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरामध्ये गुरुवार दि.९ एप्रिल रोजी लहान मुलांच्या कुस्त्या लावल्या. जमावबंदी आदेशाला यामुळे हरताळ फासला गेला. अशी तक्रार सुखदेव शामराव गीते यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तर जमावबंदी आदेशाचा भंग करत भैरवनाथ मंदिरात दहा ते बारा लोकांनी एकत्रीत येवून आरती करीत असल्याचे माहिती मिळाल्यावरून दि.८ एप्रिल रोजी पोलिसांनी छापा टाकला असता त्यावेळी अंधाराचा फायदा घेत सर्व तेथून पळून गेले.
जिल्हाधिकारी यांच्या कोरोना पार्श्वभूमीवरील जमावबंदी आदेशाचे यामुळे उल्लंघन झाले. करंजी औट पोस्टचे पोलिस कर्मचारी ईश्वर बेरड यांनी फिर्याद दिली आहे. तर सुखदेव गीते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवस्थानचा यात्रोत्सव आठ एप्रिल रोजी होता. कोरोना संसर्गामुळे तो रद्द केला होता. कुठल्याही प्रकारचा धार्मिक विधी होणार नसल्याने मंदिर परिसरात गर्दी करू नये. असे सार्वत्रिक आवाहनही केले होते.
त्यामुळे कोणीही भाविक ग्रामस्त तिकडे फिरकले नाही. दुसऱ्या दिवशी मात्र मंदिर परिसरात सुरुवातीला लहान मुलांच्या कुस्त्या लावल्या. नंतर काही वेळाने कुस्त्या लावणाऱ्यांनीही आपसातच कुस्त्या करत जमावबंदी आदेशाची पायमल्ली केली. या कुस्त्या करत्यावेळी एकमेकांत कोणतेही अंतर ठेवले नव्हते. तसेच तोंडाला मास्क ही लावले नव्हते. जमावबंदी आदेशाचे यामुळे उल्लंघन झाले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®