अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : यशापयशाचा विचार न करता गोरगरीब, शेतकरी व समाजासाठी काम कसे करत रहावे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मंत्री शंकरराव गडाख असल्याचे प्रतिपादन देवगडचे भास्करगिरी महाराज यांनी त्यांच्या सत्कारप्रसंगी केले.मंत्री म्हणून काम सुरू करण्यापूर्वी गडाख यांनी श्रीक्षेत्र देवगड, शनिशिंगणापूर व टोका येथील बालब्रह्मचारी महाराजांकडे जाऊन दर्शन व आशीर्वाद घेतला.
देवगड येथील कार्यक्रमात भास्करगिरी महाराज म्हणाले, गडाख यांनी यश-अपयशाचा विचार न करता केवळ समाजाकरता काम केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण ठेवून कामे केली, म्हणून त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली. मंत्रिपदाने आपल्या नेवासे तालुक्याला मोठा बहुमान मिळाला आहे.
वरिष्ठ जी जबाबदारी सोपवतील, ती ते पार पाडणार आहेत. त्यांच्या कामाची झलक आता राज्याला पहायला मिळणार आहे. त्यांना राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी नेवासे तालुक्याच्या वतीने व देवगड संस्थानच्या वतीने महाराजांनी शुभेच्छा दिल्या.
या वेळी मंत्री गडाख म्हणाले, राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्याअगोदर तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन दत्तप्रभूंचे दर्शन करून आशीर्वाद घेण्याचे मी ठरवले होते.
त्याप्रमाणे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे आशीर्वाद घेऊन तालुक्यातील, राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची, गोरगरीब जनतेची सेवा मी सुरू करणार आहे. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांचे आशीर्वाद आहेतच.
पुढेदेखील राज्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता आशीर्वाद लागतीलच. येणाऱ्या कालावधीत सगळ्यांना बरोबर घेऊन ही विकासाची गंगा आपण अविरत पुढे नेणार आहोत.