संगमनेर : तालुक्याच्या पठार भागावरील तळेवाडी येथे नितीन तुकाराम फटांगरे या तरुणाने बिबट्याच्या तावडीतून आपल्या वासराची सुटका केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १२) दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली.
वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांनी ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पोखरी बाळेश्वर गावाअंतर्गत असलेल्या तळेवाडी येथील तुकाराम फटांगरे यांचा मुलगा नितीन हा गुरुवारी दुपारी शेळ्या व जनावरे चारण्यासाठी वाडीपासून काही अंतरावरील शेतात गेला होता.
त्याच दरम्यान जवळ असलेल्या एका झुडपात बिबट्या दबा धरून बसला होता. त्या ठिकाणापासून दहा फुट अंतरावरच जनावरे चरत होते आणि अचानक बिबट्याने वासरावर झडप मारली. त्यामुळे हे सर्व दृश्य पाहून नितीन या तरुणाने मोठमोठ्याने आरडाओरड करत बिबट्याच्या तावडीतून वासरू सोडवले आहे.
त्याचवेळी बिबट्याने डरकाळी फोडत नितीनकडे येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.
वासराच्या गळ्याला बिबट्याचे दात लागले होते. नितीनचे दैवबल्वतर असल्याने तोही बालंबाल बचावला. दोन ते तीन दिवसांपूर्वी परिसरातील विकास रभाजी दिघे याही शेतकऱ्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत जखमी केले होते