अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. या पदासाठी विद्यमान अध्यक्ष शालिनी विखेंसह राष्ट्रवादीच्या राजश्री घुले, काँग्रेस थोरात गटाच्या अनुराधा नागवडे, राष्ट्रवादीच्या प्रभावती ढाकणे यांची नावे चर्चेत आहेत.
मंत्री बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जि. प. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. राज्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर प्रथमच जि. प. अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.
विद्यमान अध्यक्ष विखे काँग्रेसच्या आहेत. त्यांचे पुत्र डॉ. सुजय हे भाजपचे खासदार, तर पती राधाकृष्ण हे भाजपचे आमदार आहेत. शालिनी विखे यांनी अजूव काँग्रेस सोडलेली नाही.
त्यामुळे त्या पुन्हा दावा करण्याची शक्यता आहे. सेना-राष्ट्रवादी व काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विखे यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपद जाणार की, राष्ट्रवादीला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीकडून विद्यमान उपाध्यक्ष घुले यांचा प्रयत्न राहणार आहे. अध्यक्षपदासाठी सदस्य प्रभावती ढाकणे यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. ऐनवेळी थोरात गटाकडून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.