कोरोनाच्या काळात खाजगी हॉस्पिटल चालकांनी मनमानी पद्धतीने बिले आकारून रुग्णांची आर्थिक लुटीच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत.
शहरातील एशियन नोबेल हॉस्पिटल प्रशासनाने वसूल केलेल्या अतिरिक्त शुल्काचा संबंधित रुग्णास परतावा देण्याचा आदेश चौकशी समितीने दिला, त्यानुसार तक्रारदार निलेश ठाकरे व रुग्ण सागर कौर यांना १९,४६० रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सागर कौर यांना कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षात येताच त्यांना एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कौर यांच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी असताना देखील अनामत रक्कम (डिपॉझिट) भरल्याखेरीज उपचार करण्यास नकार दिला.
नाईलाजाने नातेवाईकांनी ३५ हजार रुपये भरले. डिस्चार्ज करतेवेळी, हॉस्पिटल प्रशासनाने, पॉलिसी कंपनीने कमी रक्कम मंजूर केल्याची बतावणी करत भरलेले डिपॉझिट परत करण्यास नकार दिला. याप्रकरणी कौर यांचे मेहुणे निलेश ठाकरे यांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्याची भनक लागताच हॉस्पिटल प्रशासनाने नमते घेत ३५ हजार रुपये रकमेचा धनादेश देत कौर यांना डिस्चार्ज ही दिला.
श्री. ठाकरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत संबंधित बिलाचे ऑडिट करण्याचे व चौकशीचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले होते. याप्रकरणी एशियन नोबेल हॉस्पिटलने अतिरिक्त शुल्क आकारल्याचे चौकशीत समोर आले.
अतिरिक्त आकारलेले शुल्क रुग्णास परत करण्याचे हॉस्पिटल प्रशासनाला आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हॉस्पिटल प्रशासनाने तक्रारदार निलेश ठाकरे व रुग्ण सागर कौर यांना बोलवून घेत १९४६० रु. रकमेचा धनादेश दिला. मनमानी करणाऱ्या हॉस्पिटल चालकांना ‘या’ आदेशाने चाप बसणार आहे. या घटनेची आज दिवसभर शहरात चर्चा रंगली आहे. ठाकरे यांनी याप्रकरणी दिलेला लढा हा कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
प्रशासनाचे आभार! : निलेश ठाकरे ( तक्रारदार)
हॉस्पिटल प्रशासन अन्यायकारक पद्धतीने रुग्णांची लूट करत असल्याचे लक्षात येताच अशा घटनांना आळा बसावा म्हणून स्वतः पुढाकार घेत तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी सखोल चौकशी झाली आणि अतिरिक्त आकारलेले शुल्क तब्ब्ल वर्षभराने परत मिळाले. याचे समाधान लाभले आहे. छोटासा का होईना लढा दिला. तो जिंकला त्यामुळे आनंद वाटत आहे. याप्रकरणी प्रशासनाने न्याय दिला. चौकशी अधिकारी आणि प्रशासनाचे आभार