राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका कॉलेज तरुणीने दि. १४ जून २०२४ रोजी सकाळी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केला.
त्यानंतर दोन तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना एका महिन्याचा कालावधी का लागला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील जागृती विश्वास शिंदे हीने नुकतेच ११वीच्या वर्गात प्रवेश घेऊन कॉलेजचे शिक्षण सुरू केले होते. जागृती ही क्लासला जात येत असताना काही रोडरोमिओ तीची छेडछाड करीत होते.
याबाबत तीने तीच्या आईलाही सांगितले होते. त्यावेळी तीच्या आईने या रोडरोमिओंना भेटून माझ्या मुलीची छेडछाड करु नका, तीला त्रास देऊ नका, तीला परत फोन करु नका, अशी समज दिली होती. त्यानंतरही रोडरोमिओंकडून तीची छेडछाड सुरुच होती.
जागृती ही रोडरोमिओंच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळून गेली होती. दि. १४ जून २०२४ रोजी सकाळी जागृती ही क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. नंतर तीने तालुक्यातील टाकळीमियाँ शिवारातील रेल्वे बोगद्याजवळ धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.
जागृतीची आई सुरेखा विश्वास शिंदे (रा.देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यांनी काल राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहुन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून देवळाली प्रवरा येथील साडेसतरा वय असलेल्या दोघा अल्पवयीन तरुणांवर गुन्हा रजि. नं. ८०३/२०२४ नुसार भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच राहुरी पोलिस पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली.