२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहरातील सराफ व्यावसायिकाची सुमारे सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सुमारे ८ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.या प्रकरणी अमृत जिवराज रावल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी भिमराव पाटील या कारागिराविरुद्ध २२ जानेवारी रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे शिंगवी ज्वेलर्स हे दुकान आहे.या दुकानाचे मॅनेजर अमृत जिवराज रावल (वय ५१, रा. सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, बुरुडगाव रोड) हे आहेत. शिंगवी ज्वेलर्स या दुकानात आलेल्या ग्राहकांच्या मागणीनुसार सोन्याची दागिने बनवण्याकरिता व दुरुस्ती करिता सुवर्ण कारागिरांना सोने दिले जातात.
त्यानुसार फिर्यादी रावल यांनी १९ व २० डिसेंबर रोजी सुवर्ण कारागीर शिवाजी पाटील यांना दागीने तयार व दुरुस्ती करण्याकरीता ८ लाख ३० हजार रुपये किंमतीचे १०४ ग्रॅम वजनाचे सोने दिले होते.त्या सोन्यातून ३ लाख रुपये किंमतीच्या ३८ ग्रॅम वजानाच्या दोन सोन्याचे चेन, १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या १७ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे गंठन, २ लाख ३० हजार किंमतीचे २९ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे नेकलेस, १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे २० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे ब्रासलेट असे दागिने बनवून दोन चार दिवसात सोन्याचे दागीने तयार करुन परत देण्याचे ठरले होते.
त्यानंतर शिवाजी पाटील यांनी सोन्याचे दागीने तयार करून दिले नाही. त्यामुळे मॅनेजर अमृत रावल यांनी पाटील यांना फोन करुन सोन्याचे दागीने देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आज देतो,उद्या देतो असे म्हणुन टाळाटाळ केली.त्यानंतर फोन उचलणे बंद केले.तसेच शिंगवी ज्वेलर्स या दुकानात येणे बंद केले आहे.
यावरुन मॅनेजर रावल यांची खात्री झाली की शिवाजी पाटील याने विश्वासाने दिलेले सोने किंवा सोन्याचे दागीने अद्यापपर्यंत आणुन न देता फसवणूक केली. त्यामुळे त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरुन पोलिसांनी शिवाजी पाटील यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (२), ३१८ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.