नगर शहरात अलीकडील काळात मारहाणीचे प्रकार वाढल्याचे दिसते. काही घटना ताजा असतानाच आता मित्राच्या वाढदिवसावरून घरी जात असलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आलीच प्रकार घडला आहे. ही घटना बुधवारी पहाटे एक वाजता वारूळाचा मारूती कमानीजवळ घडली.
सचिन मुरलीधर ठाणगे (वय २९ रा. दातरंगे मळा, वारूळाचा मारूती) असे कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांनी तोफखाना पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ओमरत्न भिंगारदिवे (रा. वारूळाचा मारूती), राहुल रोहकले (रा. रोहकले गल्ली, नालेगाव), गणेश भुजबळ (रा. दातरंगे मळा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. मंगळवारी (दि. १३) फिर्यादीचा मित्र निखिल भिसे यांचा वाढदिवस होता.
वारूळाचा मारूती कमानीजवळ वाढदिवस साजरा केल्यानंतर फिर्यादी, त्यांचा मित्र अमित चित्राल व निखिल भिसे घरी जाण्यासाठी निघाले असता ओमरत्न, राहुल व गणेश हे तिघे तेथे होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्याकडे पाहिले असता ओमरत्न त्यांना म्हणाला, ‘तु माझ्याकडे का पाहतो, त्यानंतर ओमरत्न याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याने हल्ला करून जखमी केले.
राहुलने लाकडी दांडक्याने व गणेशने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी फिर्यादी यांनी आधी जिल्हा शासकीय रूग्णालयात जाऊन औषधोपचार घेतले. त्यानंतर तोफखाना पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. या मारहाण प्रकारांचाच अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान शहरातील गुन्हेगारी वृत्तीवर पोलिसांनी जरब बसवावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.