Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथे सासरच्या घरातील बेडरुममध्ये सायली अविनाश वलवे (वय २३) या युवतीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी तिच्या सासूच्या जबाबानुसार तिने बेडरुमच्या खिडकीच्या चौकटीला ओढणीने गळफास घेतल्याचे म्हटले होते.
तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिची सासू व पतीविरोधात शारिरीक मानसिक त्रास देऊन मारहाण तसेच माहेरुन औजारे आणण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. मात्र मृत युवतीच्या शवविच्छेदन अहवालाने या प्रकरणाचे बिंग फुटले असून पूर्वीच्या गुन्ह्यात आता खूनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
याबाबत मयत महिलेचे वडिल विजय महिपत पवार (रा. मंगळापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत सायली हिचा विवाह ९ मे २०२३ रोजी मिर्झापूर येथील अविनाश निवृत्ती वलवे याच्यासोबत हिंदू विवाह पध्दतीने झाला होता.
मात्र तिला पैशांच्या कारणावरुन त्रास सुरु होता. दहा बारा दिवसांपूर्वी तिची सासू सुभद्रा हिने ‘तुला स्वयंपाक येत नाही, तुला घरातील लोकांसोबत चांगले वागता येत नाही, तु माझ्या मुलाच्या बळेच गळ्यात पडली असून, तुझ्यापेक्षा चांगली बायको मिळाली असती’, असे सांगत तिच्या नवऱ्याचे कान भरले होते. त्यामुळे तो हिला नेहमी मारहाण करीत असे.
याबाबत सायलीने आम्हाला फोन करुन सांगितल्याचे म्हटले आहे. त्यानुसार २१ एप्रिल रोजी तिच्या सासरी जाऊन तिची सासू व पतीला समजावण्याचा प्रयत्नही केला होता.
त्यावेळी त्यांनी ट्रॅक्टरची औजारे खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळीच सायली हिने दोन लाख रुपये न दिल्यास हे लोक मला मारून टाकतील, अशी भीती व्यक्त केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.
गुरुवार (ता.२६) रोजी रात्री आठच्या सुमारास चुलत भाऊ श्रीकांत पवार याने सायलीला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्याचे सांगितले. तेथील डॉक्टरांनी तिला मयत घोषीत करताना तिने गळफास घेतल्याचे समजल्याचे म्हटले आहे.
शवविच्छेदनाच्या अहवालानुसार फिर्यादी वडिलांचा पुरवणी जबाब नोंदवून घेऊन, पोलिसांनी तिचा पती अविनाश व सासू सुभद्रा यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
गळा आवळून केला सायलीचा खून
मयत विवाहितेचा मृतदेह पाहिल्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास दुमणे यांना या प्रकरणात काळेबेरे असल्याचा संशय आला होता. त्यामुळे त्यांनी शवविच्छेदन करण्यासाठी लोणी येथून प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाला पाचारण केले होते.
प्राप्त झालेल्या अहवालानुसार सायली वलवे हिची आत्महत्या नसून, तिला अमानुष मारहाण करुन व गळा आवळून खून केल्याचे वैद्यकिय अहवालातून सिद्ध झाले आहे. मारहाणीमुळे तिच्या डोक्याला गंभीर मार लागून मेंदूत रक्तस्त्राव झालेला होता. तसेच शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा होत्या.