Ahmednagar News : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात जेवण करण्यासाठी बसलेल्या पंगतीस जेवण वाढण्यास नकार दिल्याने आरोपींनी आकाश खिलारी या तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून चोरली. नंतर त्याला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे दि. २६ मे २०२४ रोजी घडली.
एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळयातील सोन्याची चैन ओढून घेण्याचा प्रकार राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे घडला आहे. याबाबत, आकाश साहेबराव खिलारी, (वय-२२) याने पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यात म्हटले आहे की, गावातील एकनाथ यादव खिलारी यांच्याघरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने तेथे आकाश बाळासाहेब खिलारी, नारायण नानासाहेब टिक्कल, रा. मंडलिक आखाडा, बारागाव नांदूर हे पण आलेले होते.
जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात ते मला म्हणाले की, जेवण वाढण्यासाठी आमच्या सोबत चल. तेव्हा आपण त्यांना म्हणालो की, जेवायसाठी अजून पंगती बसलेल्या नाही, पंगती बसल्यावर आपण वाढू. असे म्हणाल्याचा त्यांना राग आला. तू आम्हाला वाढीव बोलत आहे असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच एकाने सोन्याची चैन ओढून घेतली.
त्यानंतर भांडण सोडवायला लोक आल्याने हे दोघे पळून गेले. त्यानंतर सदर आरोपींनी आपल्या घरी जावून घरासमोर उभा असलेल्या छोटा हत्तीतून डिझेल काढून ते घरात टाकून घरातील सामानाची नासधूस करत विरोध करणाऱ्या आपल्या आईला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आकाश बाळासाहेब खिलारी, नारायण नानासाहेब टिक्कल, गणेश संभाजी गाढे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.