Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असताना आता शेवगाव तालुक्यातून एका खुनाची घटना समोर आली आहे.
शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या वादातून एकास मारहाण करण्यात आली. शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे काल (२ मे) रात्री साडेदहा वाजता लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणूक निघाली होती. या मध्ये जुन्या किरकोळ भांडणावरून सात ते आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून अक्षय आपशेटे (राहणार शहर टाकळी) यास गंभीर जखमी केले.
रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान संबंधित प्रकार घडला असून त्यास अधिक उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.
शेवगाव पोलीस स्टेशन येथे त्याचा बंधू संकेत संजय आपशेटे वय 28 यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीनुसार अजय दावीद कोल्हे , किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, विकास संजय कोल्हे यांवर गुन्हा दाखल केला आहे.
सदरची घटना पाहणाऱ्या प्रत्यक्ष दर्शनीने सांगितलं की, दोन तारखेला रात्री साडेदहा वाजता लक्ष्मी देवी मंदिराजवळ स्ट्रीट लाईट मध्ये सात ते आठ इसम घातक शास्त्रांनी अक्षय संजय आपशेटे यास लाथा बुक्क्यांनी आणि घातक शास्त्राने जबर मारहाण करत होते.
संबंधित गुन्ह्यांमध्ये एक आरोपीस अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार झालेले आहेत. गुन्ह्याचा तपास शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.