Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांचा वाढता आलेख ही चिंतेची बाब आहे. किरकोळ गोष्टींचा वाद अगदी मारहाण व थेट खून करण्यापर्यंत जात असल्याचे चित्र दिसते. आता अहमदनगरमधून भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर जन्मदात्या आईला देखील मारहाण केली आहे. गणेश विकास काळे असे आरोपीचे नाव आहे. तर नितीन विकास काळे (वय २८) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आई जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे.

अधिक माहिती अशी : हिंगणगाव गावाच्या शिवारात भोसले वस्तीवर अशोक गायकवाड यांच्या शेतात गणेश काळे व नितीन विकास काळे हे पाल टाकून राहत आहेत. ४ एप्रिल रोजी रात्री दहाच्या दरम्यान गणेश काळे याने नितीन काळे यास मी कामावर गेल्यावर माझ्या मुलाला मारहाण करतो असे म्हणत वाद सुरु केला.
त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. हे वाद अगदीच विकोपाला गेले व त्याचे हाणामारीत पर्यावसन झाले. गणेश काळे याने या भांडणात नितीन याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोराने प्रहार केला. हा घाव वर्मी लागल्याने नितीन काळे मरण पावला. या दोन भावांमधील वाद सोडवताना त्यांची आई रिबीना विकास काळे मध्ये आल्याने त्याही जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरु आहेत.
पोलिसांना घटनेची माहिती समजताच घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. कोहिनूर साहेबराव भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली असून गणेश काळेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.