Ahmednagar Shivjayanti :- यंदा तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवजयंतीसाठी नगर शहर शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपाच्यावतीनेही सार्वजनिक मिरवणूकीचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
यंदा करोनाचे संकट नसल्यामुळे तिथीनुसार होणार्या शिवजयंतीसाठी नगर शहर पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातून रूटमार्च काढण्यात आला. यावेळी कोतवाली, भिंगार, तोफखाना, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
आज (सोमवार) ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक 1, पोलीस उपअधीक्षक 1, पोलीस निरीक्षक 6, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक 17, पोलीस कर्मचारी 310, होमगार्ड 100, राज्य राखीव दलाची एक तुकडी असा बंदोबस्त असणार आहे.
सुमारे नऊ सार्वजनिक मंडळाकडून शिवजयंती साजरी केली जाणार आहे. दरम्यान शासनाने लागू केलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना नगर शहर पोलिसांकडून शिवजयंती साजरी करणार्या मंडळास देण्यात आल्या आहेत. मिरवणूकीला परवानगी नाकरण्यात आली आहे.
रात्री 12 वाजेपर्यंत एका जागेवर स्पीकर वाजवून शिवजयंती साजरी करण्याची परवानगी शहर पोलिसांनी दिली असल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी सांगितले. भादंवि कलम 149 नुसार मंडळास नोटीसा देण्यात आल्या आहेत. परंतू पोलिसांचा आदेश न जुमानता शिवजयंती मिरवणूक काढण्याची तयारी मंडळाने केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवजयंतीसाठी नगर शहर शिवसेनेच्यावतीने मिरवणुकीत पारंपारिक देखाव्यांसह प्रत्येक चौका-चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. भाजपाच्यावतीने शिवजयंती मिरवणूकीचे नियोजन करण्यात आले आहे. आज दुपारी 4 वाजतापासून शिवछत्रपती पुतळ्या पासून मिरवणूकीच प्रारंभ होणार आहे.